Friday, November 10, 2023

लाडकी परी

मोठी झालीस तू जरी
बाबांचीच लाडकी परी ।
कौतुक तुझे मनात किती
तुलाच शोधतो भिरभीरी ।

लहानपण आठवते अजून
हट्टी स्वभाव होता भारी ।
हवे म्हणजे ते हवेच तुला
रूसून बसायची पुढच्या दारी ।

खोटे खोटेच तू रडायची
बोलताच कुणी काही तरी ।
आईस्क्रीम बघताच मात्र कशी
क्षणात खुश व्हायची स्वारी ।

किती आता बदललीय तू
शांत स्वभाव नी परोपकारी ।
प्रत्येक गोष्टीचा विचार मनात
पेलतेस सारीच जवाबदारी ।
Sanjay R.



Sunday, October 15, 2023

ऑक्टोंबर 2023 कविता प्रकाशित

माझे व्यासपीठ या मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या ऑक्टोबर 2023 च्या मासिक अंकात माझी   कविता प्रकाशित झाली.
संपादकांचे मनापासून आभार.

Monday, October 9, 2023

काव काव

काव काव

पोटात होताच काव काव
घेतो स्वैपाक घरात धाव ।
जडवले घडवले ज्यांनी
विसरलो ना त्यांचेही नाव ।

म्हातारे म्हणून लोटले दूर
घरात त्यांचा नव्हता भाव ।
आता परंपरेच्या नावाखाली
करतो आठवण नाही डाव ।

येरे ये तू कावळ्या आता
सांग निरोप घेऊन धाव ।
चूक झाली आमची तेव्हा
पितरांमुळेच आमचा ठाव ।

संजय रोंघे

Friday, October 6, 2023

स्त्रीशक्ती

नवीन एक स्तंभ
नवीनच आरंभ ।
स्त्री ची भागीदारी
राजकारण अगडबंब ।

कुणास ते पसंत
मनी कुणाच्या खंत ।
वारा तर वाहतो
पण किती संथ ।

होऊ दे एकदाचे
रणांगणात बंड ।
नाही येणार मागे
वाट ही अखंड ।

असू दे पायरी
काढतील त्या धिंड ।
शिखरावर दिसेल
स्त्री शक्तीचा दंड ।
Sanjay R.


Thursday, October 5, 2023

प्रवासी

जीवनाची गाडी
जन्म ते मृत्यू ।
आरंभ ते अंत
दोन टोकाचे स्टेशन ।

मधे अनेक थांबे
आपण फक्त बघायचं ।
कुठे थांबायचं
कुठे निघून जायचं  ।

मार्गात प्रवासी अनेक
उतरणारे चढणारे ।
जीवाच्या आकांताने
फक्त जगणारे ।

कुणी हसरा
कुणी लाजरा  ।
रडकाही वाटतो
कधी कधी साजरा ।

सुख आणि दुःख
त्यात विरोधाभास ।
चालायचंच हे

थांबे वरी श्वास ।
Sanjay R.