Monday, September 30, 2024

काळीज

  " काळीज "
दुःख म्हणू मी कशास
आग पेटली काळजात ।
श्वास करती धडधड
बंध तुटले अंतरात ।
Sanjay R.

Sunday, September 29, 2024

माणुसकी

     मराठीत माणुसकी, हिंदीत इन्सानियत, तर इंग्रजीत ह्युमिनिटी किती साधा, सरळ आणि सोपा वाटणारा हा शब्द आहे.

      पण याच शब्दाला जर आपल्या हृदयात, आपल्या मनात, किव्वा आपल्या मस्तिष्क मधे जर स्थापन करायचे असेल तर.

      खूप कठीण वाटते ना. खरंच हे इतके कठीण आहे का ?

       हो हे फार कठीण असे कृत्य आहे. किमान आजच्या या धकाधकीच्या जीवनात तरी खूप कठीण आहे.

     आता कालचीच गोष्ट बघा, रस्ता गजबजलेला , माणसं, बाया, मुलं , यांची धावाधाव चाललेली. रस्त्याच्या बाजूने विक्रेत्यांनी जागा व्यापलेली. तिथल्या आवाजाने असे वाटावे की किती हा गोंधळ. किती ही गडबड.

     कशी मुंग्यासारखी माणसे सारखी पळताहेत. क्षणाक्षणाला गर्दी बदलतेय. कुठून इतकी माणसं येतात नी कुठे जातात, कळेनासे होते पण, प्रत्येक जण इतका घाईत असतो की, तो आपले अस्तित्वच विसरतो.

      आजुबाजुला काय होतंय याच्याशी त्याला काहीच देणे घेणे नसते. कुणी पडला काय, कुणी अडला काय, किव्वा कुणी रडला काय, काही सोयरसुतक नाही.

      चालता चालता रस्त्यात येकाचा अपघात झाला.
पाई पाई रस्ता क्रॉस करताना, बाईक वाल्याने त्याला उडवले. तो एका कडेला तर बाईक वाला दुसऱ्या कडेला पडले. दोघांचेही नशीब चांगले , पडले आणि स्वतःच धडपडत, आपले हात पाय चाचपडत, कसेतरी उठले. आणि आपापल्या दिशेने चालायला लागले. ना कुणी कुणाची विचारपूस केली. ना कुणी मदतीला धावले. स्वतःचे स्वतः ला सांभाळले, उठले आणि चालायला लागले, चुकी दोघांचीही असल्याने वाद, विवाद, मारामारी  झाली नाही बस इतकेच. नाहीतर अजून काही तरी वेगळेच बघायला मिळाले असते. पण दोन तीनशे च्या त्या तिथल्या गर्दीत कुणालाच काही देणे घेणे नव्हते. सगळेच दुर्लक्ष करत आपल्याच धुंदीत जात येत राहिले.

      मग सहजच मनात आले, हीच का ती माणुसकी ?

      कदाचित या ठिकाणी थोडा वेगळा सिन असता तर ?

      तरीही काही वेगळे असे घडले नसते. दोन चार थोडे फुरसती असणारे लोक , बिनधास्त खिशातून मोबाईल काढून व्हिडिओ बनवत राहिले असते किव्वा वाहन चालका वर ओरडत किव्वा त्याला चोप देत राहिले असते.

      येवढे मात्र नक्की की, कुणाला मदतीची गरज असती तर त्याला ती कुणीच दिली नसती. सारेच आपापल्या तंद्रीत धावत राहिले असते.

      ही एवढीच माणुसकी आता उरलेली आहे.
आपण आपल्या घरा शेजारी किव्वा गावात ही बघतो की ज्याची आपल्याला गरज पडू शकते , किव्वा जो अडचणीत आपल्या मदतीला धावून येऊ शकतो त्यालाच ते मदत करतात. धाऊन जातात. कारण तिथे दोघांचाही स्वार्थ लपलेला असतो. आणि म्हणून ते एकमेकांना धरून असतात.

      तो माझ्या मदतीला येऊ शकणार नाही तर मग मी का मदत करावी असा सरळ सरळ हेतू ठेऊनच लोक वागत असतात. यात माणुसकी म्हणून कुठे काहीच नसते.

असतो तो फक्त आणि फक्त स्वार्थ.

      यात दोष कुणाचा म्हणावे तर . मलातरी वाटते यात दोष कुणाचाच नाही. आजचे जीवनच त्याला जवाबदार आहे.

       आपल्या गरजा, आपले हित, पैसा कमावण्याची होड या साऱ्यामध्ये माणसाने स्वतःला इतके गुंतवून घेतले आहे की त्याच्याकडे वेळच उरला नाही.

        वेळेवर उठायचे, धावत पळत तयारी करायची. वेळेवर कामावर पोचायचे. काम आटोपून परत घरी पोचायचे, घरातली कामं उरकायची, नी थकून भागून झोपी जायचे.

     जास्तीचा वेळ कुणाकडे उरतच नाही. जो तो घड्याळीच्या काट्यावर नुसता धावत असतो. ती त्याची मजबुरी झालेली आहे. आणि या धावा धावित  तो आपले संस्कार , आचार, विचार, हित, अहित सारेच विसरला.

       त्यात त्याला आजूबाजूच्या घडामोडीत लक्ष द्यायलाही वेळ उरला नाही. असाच धावत पळत जगतो. हेच त्याचे जीवन झाले आहे. या पळापळी पुढे तो हतबल झालेला आहे. आणि त्यामुळे मनात असूनही तो इतरत्र लक्ष देऊ शकत नाही. कुणाचा विचार करू शकत नाही. किव्वा कुणाला मदत देऊ शकत नाही.

       हीच ती प्रवृत्ती माणसाला बदलावत चालली आहे. माणुसकी संपुष्टाला लागली आहे. या सोबत तो आपली संस्कृती, आचार, विचार दया, माया, प्रेम हे सारेच विसरत चालला आहे.

       यात दोष शोधला तर तो त्या माणसाचा कमी आणि त्याच्या मजबुरीचाच जास्त दिसेल.

       अन्यथा साधे किडा , किटुक, प्राणी, माणूस यांचे दुःख बघून तळमळणारा , हळवा होणारा, तत्परतेने मदतीला धावणारा माणूस इतका असाच सहज सहजी कसा बदलेल.

आपल्यातली माणुसकी कसा विसरेल.

      प्रश्न खूप मोठा आणि गहन विचार करायला लावणारा आहे. जग बदलत आहे. सोबतीला माणूसही बदलत आहे.

संजय रोंघे, नागपूर.
मोबाईल - 8380074730


Saturday, September 28, 2024

आभाळ

" आभाळ "

नजर वर आकाशात
आले भरून आभाळ ।
डोळ्यात थेंब आसवांचे
अंतरात पेटला जाळ ।
Sanjay R.

Wednesday, September 25, 2024

गेलेत ते दिवस

"मित्रगण" हा आमच्या पाचवी पासून ते इंजिनिअरिंग पर्यंत सोबत असलेल्यां मित्रांचा व्हॉट्स ॲप ग्रुप.

आज अचानक निर्विकार मनाने मित्रगण मधले मेसेजेस उघडुन बघत बसलो .

कुणी कुणी काय काय मेसेजेस टाकले ते नुसतेच बघत राहिलो. सारेच फॉरवर्ड केलेले मेसेजेस होते.

काही उपदेशाचे तर काही हसविण्याचे, काही फक्त गुड मॉर्निंग, तर काही फक्त अंगठा दाखविणारे.

जणू कुणाला कशाचे काहीच देणे घेणे नव्हते. फक्त हयात असल्याची जाणीव करून देणारे ते प्रतीक होते.

नंतर लक्ष गेले ते मेसेज टाकलेल्या नावांकडे.
नावावर क्लिक केले तर पोस्ट टाकलेल्या मित्राचा फोटो उघडला.

आणि पाहतच राहिलो......

त्यातच किती वेळ गेला कुणास ठाऊक.

मग सहजच मनात विचार आला, किती बदलला रे तू, शाळेत असताना कसा दिसायचा आणि आता कसा दिसतोस .

खूप खूप फरक जाणवत होता. मग एकदम ग्रुप ची लिस्ट च काढली. सगळ्यांचे चेहरे बघत राहिलो.

सगळेच खूप बदलले होते. काही चेहरे तर अगदी ओळख न पटण्याईतके बदलले होते.

कितीतरी वेळ असाच बघत राहिलो.

मग परत एक विचार मनाला शिऊन गेला. अजून पंधरा वीस वर्षानंतर हेच चेहरे कसे दिसतील.

तेव्हा यातले किती उरतील, किती दिसतील कुणास ठाऊक.

मीही इथे असेल का ?

डोक्यात आता काळजीने घर केले होते.

या लिस्ट मधे नसलेल्यां नावांना आठवण्याचा प्रयत्न केला. त्यांचे चेहरे आठवण्याचा प्रयत्न केला. त्यातले काहीच डोळ्यापुढे येत होते. बाकी पुसलेल्या पाटिगत
डोक्यातून पुसले गेले होते. नाव चेहरा काहीच आठवत नव्हते.

जे आठवत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर नसल्याने ते ग्रुप साठी तरी अदृश्यच होते.

ते असतील नसतील काहीच ठरवता येत नव्हते.

अजून काही नावे समोर आली. ते मधेच केव्हातरी सगळ्यांना राम राम करून दूर निघून गेले होते.

परत मन स्तब्ध झाले. नजर शून्यात लागली. विचारातच मन अस्वस्थ झालं.

बराच वेळ असाच बसून राहिलो. बरेच विचार मनात डोकावून गेले.

मन अशांत झाले.

मग मनात आले , जे आहेत त्यांच्याशी तरी काही बोलावे, सांगावे, ऐकावे.

जुन्या गोष्टींना थोडा उजाळा द्यावा.

परत ती मस्ती, भांडण, खोड्या, अभ्यास, शाळा, गुरुजी, मॅडम सगळे सगळे करावे पण कसे येतील परत ते दिवस. आता फक्त आठवणी तेवढ्याच बाकी आहेत.

गेलेत ते दिवस.....

पुन्हा परतून यायचे नाहीत....

आता जपायच्या त्या फक्त आणि फक्त मनात उरलेल्या आठवणी.

मित्रानो आज आपण सारेच इथे आहोत. उठा जागे व्हा. जरा भेटत जा. बोलत जा. आपलेपणा जपा, एकमेकांना समजून घ्या.

केव्हा काय होईल काहीच सांगताच येणार नाही.

संजय रोंघे
मोबाईल - 8380074730



आपले ते ओळखायचे

स्वतःतच हरवायचे
आपल्यातच मिरवायचे ।
देऊन दुसऱ्यास भाव
आपणच का हरायचे ।

हरवायला लाख इथे
आपले ते ओळखायचे ।
आपल्यांचीच साथ खरी
त्यांच्यासाठी झिजायचे ।

स्वार्थी इथे बहुत झाले
आपलाही स्वार्थ बघायचे ।
देणे घेणे व्यापार झाला
त्यालाही आपण जोडायचे ।
Sanjay R.

विश्वास

असेल वार शब्दांचे
जखमा झाल्या खोल ।
हृदयात काय उरले
तिथेही मोठ्ठा गोल ।

आठवतात अजूनही
तुझे ते मोठमोठे शब्द ।
विश्वासचं सरला आता
श्वासही होतात स्तब्ध ।

तू वाटायची वेगळी
द्यायची पण विश्वास ।
कळलेच नाही मला
ते होते फक्त आभास ।

दूरच असतो आता
नको वाटते दुनिया ।
करू कुणास जवळ
सारेच इथे बनिया ।
Sanjay R.

इच्छा शक्ती

ईच्छा मनात अपार
येती तेच ते विचार  ।
बदलती सारे आचार
पण नशिबापुढे लाचार ।

कामच करे ना शक्ती
लावायच्या किती युक्ती ।
आयुष्यभर चाले भक्ती
मग मिळेल कशी मुक्ती ।

अति कशाला ध्यास
मुक्ती चा एकच मार्ग
आहे त्यात समाधान
मिळेल तिथेच स्वर्ग ।
Sanjay R.


Monday, September 23, 2024

आठवण

अलक : आठवण

किती वेळ आकाशाकडे बघत होता कुणास ठाऊक.
मग अचानक उठला आणि चालायला लागला.
गोटे, माती, काटे, कुटे काय काय पायाखालून जात होते भानच नव्हतं.
पाय आणि मन दोन्हीही रक्त बंबाळ झाले होते.
आठवण घराची आली नी अस्वस्थ झाला.
मग अचानक थांबला आणि परत फिरला.

✍️संजय रोंघे
      नागपूर

वादळ

येशील तू कधीतरी
वाटेवरच होते डोळे ।
विश्वास तुटत चालला
तरीही मन मात्र खुळे ।

डोळ्यात तू बघ जरा
साचलेय तिथे तळे ।
आठवणींना आठवून
मन मनातच जळे ।

थेंब आसवांचा कसा
गालावरून ओघळे ।
हुंदका दाटला आत
ओठांना तेही कळे ।

न मी राजा तू राणी 
सगळेच इथे वेंधळे ।
समजून उमजून सारे
भासावतात आंधळे ।

साद घेतो मी जराशी
उरात जरी वादळे ।
ये ना ये एकदा परत
संथ होतील वावटळे ।
Sanjay R.


Saturday, September 21, 2024

कोण कुठला आनंद

प्रितीची वेगळी कहाणी
प्रेम त्यातला एक बंध ।
आठवांनाही येतो पूर
मन होते तिथेच धुंद ।

हरते भूक आणि तहान
विचारांना वेगळा छंद ।
मोगरा फुलतो गुलाबात 
दरवळतो दूर तो सुगंध ।

दुसरे दिसे ना काही
डोळे असूनही अंध ।
नाजूक रेशमाचे धागे
वाटतात ते एक संध ।

कुठूनसा येतो वारा
विखुरतात सारे स्पंद ।
येते दुःख सोबतीला
कोण कुठला आनंद ।
Sanjay R.

Friday, September 20, 2024

मनातलं प्रेम

पहिल्याच त्या भेटीत
झालं कसं ते प्रेम ।
हृदयावर झाला घाव
अचूक होता नेम ।

रोजच्याच मग भेटी
बोलायचा पण एम ।
वाढत गेलं सारच नी
सजला प्रेमाचा गेम ।

कुठे काय बिघडलं
रुसली एकदा मेम ।
तू कुठे मी कुठे आता
स्वतःशीच वाटतं शेम ।
Sanjay R.


मन

असे कसे हे मन
सुटेना एकही क्षण ।
सारखे येतात विचार
येतो फिरून सारे रण ।

अस्वस्थ करून जातो
विचारांचा छोटा कण ।
होतात आघात डोईवर
जणू पडताहेत घण ।

भळभळ वाहते रक्त
दुःखाचा एकच व्रण ।
आसवेही येती डोळ्यात
दाटतो गळ्यात खण ।

फुलतो पिसारा जेव्हा
प्रफुल्लित होते मन ।
वाटतो बघावा थोडा
काढून मनाचा कण ।
Sanjay R.





Thursday, September 19, 2024

साजणी

दूर किती ती चांदणी
व्हावे तीनेही साजणी ।
गरीब बापाची ती लेक
दुनिया तिची विराणी ।

कसा खेळ हा नशिबाचा
काय कशाची निशाणी ।
गालात तिनेही हसावे
पुसून डोळ्यातले पाणी ।

मंत्र मुग्ध होतील सारे
ऐकुनी गोड तिची वाणी ।
हसत फुलत जगावे
होऊन तिने ही राणी ।

चांदोबाची रोजच ऐकतो
किती किती ती गाणी ।
ऐकावीशी वाटते आता
मज चांदणीची कहाणी ।
Sanjay R.


Wednesday, September 18, 2024

प्रेम कहाणी

सांगतो  तुमाले राजेहो
एका प्रेमाची कहाणी ।
प्रेम तिथं कमी आन
लय होती गाऱ्हाणी ।

भांडू भांडू त्यातले भौ
येळ कमी पडे ।
भांडण सरल्यावर कानी
दोघं बीन रडे ।

थो मने महा लयच चुकल
मी हावोच थोडा ताली ।
तुले बी काई समजत न्हाई
खीचतं तू वर खाली ।

यापुढ आता भांडाचं न्हाई
भांडण होते ते तुह्याच पाई ।
भाय गुस्सा आला तिले
मंग दात ओठ खाई  ।
Sanjay R.


Tuesday, September 17, 2024

डाव

कशाला कुणाच्या पडतो मधात ।
उगाच घोर का लावतो मनात ।
येयील सारेच त्याचे ध्यानात ।
आपलेच उलटतील डाव क्षणात ।
देतील घाव ते तुझ्याच उरात ।
उरेल काय मग तुझ्याच घरात ।
Sanjay R.


Monday, September 16, 2024

पिढ्यांचा प्रवास

केव्हाच सरला तो काळ
पिढ्यानपिढ्या एकत्र राहायचे सारे ।
विभक्त कुटुंब पद्धती आली आणि
वेगळे राहायचे शिरले वारे ।
Sanjay R.

Saturday, September 14, 2024

पाठीवर हात

आहे श्वास तोवर
वाटते हवी साथ 
श्वासा सोबत सुटतो
सोबतीचा हात ।

जगता जगता कोणी
करी आपलाच घात ।
नको वाटते तेव्हा
मग कुणाचीच साथ ।

कधी जीवनाची जेव्हा 
अशी होते वाताहात ।
हवा नको कुणास 
सांगा सोबतीचा हात ।

सदा सदा असावी
कुणाची तरी साथ ।
आपुलकीचे शब्द दोन
नी पाठीशी एक हात ।
Sanjay R.

Friday, September 13, 2024

आपुलकीचा स्पर्श

प्रेमाचा असेल गंध जिथे
आपुलकीचा तिथे स्पर्श ।
मनाचे होते मिलन जिथे
मिळे जीवनात तिथे हर्ष ।
Sanjay R.

Thursday, September 12, 2024

माणसाची ओळख

रोजच वाजतात
रात्रीचे दोन ।
डोळाच लागत नाही
मनात बसले कोण ।

डोळ्यापुढे येते भूत
ठेवते मानगूट धरून ।
डोळे गच्च मिटलेले पण
घाम फुटतो दरदरून ।

फुटत नाहीत शब्द
श्वास घेतो मोठा ।

माणसाची काय ओळख
तोही आहे खोटा ।
Sanjay R.


Tuesday, September 10, 2024

कशाची आशा

कोण कुठली ही कशाची आशा
पावलो पावली तर होते निराशा ।
चित्त हरपते नी का बेभान होतो
मनालाच कळते मनाची भाषा ।
Sanjay R.


माणूस

कठीण इथल्या वाटा
दुर्लभ इथला माणूस ।
शोधतो कशा कुणा तू
स्वभाव ही नको जाणुस ।

करेल तो घात जेव्हा
कळेल इथला माणूस ।
घात पाती तो जबर
अश्रू नको तू आणुस ।

विचारी इथे कोण उरला
तूही तर आहेस माणूस ।
माणूस वैरी माणसाचा
शोधू नको तू माणूस ।
Sanjay R.


Monday, September 9, 2024

गाथा

गेलो थकून मी आता
सोडू कुठे ती गाथा ।
जिव्हा झाली ही शांत
बंद डोळे नी वर माथा ।

एकेक दिवस सरतो मागे
ऐकेल कोण इथली कथा ।
क्षणा क्षणाला बदलते सारे
माझी मीच आठवतो व्यथा ।

कधी डोळ्यात होते अश्रू
आता आटल्या तिथल्या लाटा ।
आता शोधत असतो दूर मीही
जायचे कुठे नी कुठल्या वाटा ।
Sanjay R.



संवेदना

दिवसा मागून गेलेत दिवस 
झेलल्या अगणित मीही वेदना ।
कळलेच नाही कधी सरली
मनातली होती नव्हती संवेदना ।

ठेऊन असतो मी डोळे उघडे पण
मागचे पुढचे काहीच का दिसेना ।
तुमच्यासारखाच गोंगाट ऐकतो मीही 
पण शब्दच उलगडत नाही कानांना ।

बस फक्त चालत असतो पुढे पुढे
घेऊन निर्विकार मी भावनांना ।
किती जोपासून ठेवायचे सांगा
दगडी काळजात या संवेदनांना ।
Sanjay R.

सुखदुःख

सुख असो वा दुःख
कशाचीच कमी नाही ।
भोग तर भोगायचेच
म्हणायचे कशास नाही ।

सुख म्हणजे आहे काय
दुःखा शिवाय सुख नाही ।
डोळ्यात आसवांचे थेंब
नी गालावर हसू नाही ।

दुःखात ही बघा हसून
त्याचे सारखे सुख नाही ।
हसा थोडे हसावा थोडे
त्यातच कळेल, दुःख नाही ।
Sanjay R.

Friday, September 6, 2024

या ना बाप्पा आता घरी

या ना बाप्पा आता घरी
वर्ष झाले हो ठेऊन दूरी ।
आसन बघा छान मांडले
स्वागताची झाली तयारी ।

गडबड होती थोडी जराशी
पाऊस पाणी होते भारी ।
चिंता होती जरा मनाशी
थांबला आता थोडा तरी ।

दिवस दहा हे आनंदाचे
तोरण पताका दारोदारी ।
मोदकांचा प्रसाद आहे
घडेल आम्हा सोबत वारी ।

आरती प्रसाद टाळ मृदंग ।
भजन पूजन करू सारी ।
या या आता लवकर या हो
बाप्पा तुम्ही आमच्या घरी ।
Sanjay R.


ही वाट दूर जाते

ही वाट दूर जाते
वाट कोण पाहते ।

उठून मीही पहाटे
निघालो तुडवत काटे ।

थकलो भागलो जेव्हा
शोधतो आडोसा कुठे ।

वरती आकाश मोकळे
खाली गवत छोटे ।

व्याकुळ होतो तहानेने
कोरड्यात पाणी खोटे ।

आसवेही सरले आता
अंतरातला श्वास दाटे ।
Sanjay R.


Thursday, September 5, 2024

डोक्याला काव

गोंधळ इथे किती
डोक्याला काव नुसता ।
दिसला तर सांगा हो
कुणी माणूस हसता ।

कपाळाला आठ्या चार
टेंशन उठता बसता ।
पोटाचे सोडाच आता
इथे खातो फक्त खस्ता ।

दिवस रात्र एकच चिंता
भुकेचा शोधतो रस्ता ।
कामास जुंपलेला बैल जसा
ढोसतो तुतारी नुसता ।
Sanjay R.

Wednesday, September 4, 2024

आभाळ

दिवस पावसाचे कसे, येते भरून आभाळ
गच्च होतो काळोख, वरती काळे आभाळ ।

मधेच येतो जाऊन, पाऊस सारून आभाळ
पाणी पाणी होते सारे, कोसळते आभाळ ।

पुराचे पाणी घरात, नदी नाले आभाळ ।
संकट सारे डोईवर, डोळ्यात दिसते आभाळ ।

शेत गेले वाहून, वावरात दिसे आभाळ ।
मेहनतीच्या झाल्या चिंध्या, नेले लुटून आभाळ ।

पोट भरायचे कसे , कोर भाकरीचे आभाळ ।
कर्ज सावकाराचे किती, फेडायचे आभाळ ।

गळ्यात घेतो फास, तिथेही असते आभाळ ।
लाकडे ओली पावसाने, जळायचेही आभाळ ।
Sanjay R.


ध्यास

नात्यात कुठला भास
असतो त्यात ध्यास ।
येते आठवण मनात
नी फुलतात मग श्वास ।
Sanjay R.

Tuesday, September 3, 2024

परिकथा

पंख लावून पाठीशी
दूर जावे आकाशी ।
दूर दूर ते आभाळ
करावे गूज ढगांशी ।

धरावा फेर थोडा
चांदोबाच्या उशाशी ।
उचलून चार चांदण्या
द्याव्या नेऊन सूर्याशी ।

परिकथांची ही दुनिया
घेतो वाचून जराशी ।
स्वप्न बघतो रात्रभर
संबंध कुठला कशाशी ।
Sanjay R.


Monday, September 2, 2024

जगण्याची लढाई

पूर्वजांनी लढली
सिमेसाठी लढाई ।
करतो आम्ही आता
पोटासाठी चढाई ।

पैसा पैसा करतात
श्रीमंतांची बढाई ।
गरिबाला कोण पुसे
आयुष्यभर मढाई ।

कष्ट आणिक कर्ज
आयुष्यभर भराई ।
जगता जगता मारतो
सावकार इथे कसाई ।
Sanjay R.