Saturday, October 22, 2022

फटाके लाडू

झूम झूम जादू
सांगा काय काढु ।
सफाई अभियान
चला अंगण झाडू ।

दिवाळी आली
हवे फटाके लाडू ।
सायंकाळी मस्त
ऍटम बॉम्ब फोडू ।

लाडू चकली कमीच खा
व्हाल नाहीतर जाडू ।
मोटू मोटू म्हणून मग
आम्ही तुम्हालाच छेडु ।

नवे नवे कपडे 
जुने आता फाडु ।
दिव्यानच्या माळा
आणि रांगोळी काढू ।
Sanjay R.


दिवाळीचे फटाके

दिवाळी तोंडावर आली पण पैसा....


खिशात एक पैसा नव्हता...


काळजी लागली होती.....


निदान या दिवाळीत तरी कमली ला एखादी साडी घ्यावी, मुलीला फ्रॉक, मुलाला पॅन्ट शर्ट, थोडी मिठाई, थोडे फटाके घ्यावे असे वाटत होते पण पैसाच नाही तर काय आणि कसे खरेदी करणार.....


यंदा पावसाने पाठच सोडली नव्हती.....

शेतात सोयाबीन तर पूर्णच वाहून गेले होते.....

तुरीची झाडही आती पावसाने जळून वळून गेली होती.......

आता आशा फक्त कपाशीची होती.....

अर्धे नुकसान तर आधीच झाले होते......

बियाणे खत औषधाचा सारा खर्च वाया गेला होता.......

पराटी ही साथ देईल असे वाटत नव्हते. बोण्ड अळीचा काहीच भरोसा नव्हता.....

पावसामुळे झाडांची वाढही झाली नव्हती......

आलेली फुलं बोण्ड पकडायच्या आधीच पावसाने गळून पडत होते......

निसर्गाचा प्रकोप सुरूच होता........ 

निंदन , औषध यातच पैसा लागत होता..... 

तरी बरं होतं की कृषी केंद्र वाला उधारीत सगळं देत होता. नाहीतर जहर पिण्याशिवाय पर्यायच उरला नसता........

पण आता उधरीचे पैसेही वाढत होते. त्यावर व्याज द्यावे लागणार होते.........


तशातच आता ही दिवाळी आली. काय करावे काहीच सुचत नव्हते........


नामा विचार करत आपल्या पराटी कडे बघत बसला होता......
तशातच संध्याकाळ व्हायला आली.....

सदा त्याला आवाज देत होता पण नामाच्या कानात त्याचा एकही शब्द जात नव्हता.......

शेवटी सदा नामाजवळ पोचला.......

नामा मात्र आपल्याच विचारात इतका मग्न झाला होता की त्याला कशाचेच भान उरले नव्हते.......

सदाने त्याला हलवून भानावर आणले.......

एकदम दचकून उठत नामा बोलला, "काऊन गा सदा काय म्हणत होता".......


"

पाय ना गा वावर पुरं वाया गेलं गा".....


"अमदा कसं होईन गा, कर्ज बी लय झालं ना, कुठून फेडनं होईन कोन जाने"......


"दिवाई आली तर एक पैसा न्हाई खिशात"....... 


"लेकरायले कपडे, फटाके आन थोडस गोड धोड कराचा इचार होता, पर सारच आता पाण्यात गेलं ना"........

"मांगल्या वर्षी बी असच झालं आन अमदा बी तसच"......

"कधी सरन हे दरिद्री कोण जाणे बाप्पा"......


तसा सदा बोलला, "भाऊ नाम कायले एवढा इचार करत, सबन बराबर होते"......

"तू लोड नको घेऊ".....

"पाय आता काल पटवारी यिउन गेला ना, सरकार कानं  अतिवृष्टी ची काही मदत करनार हाये.... पाहू होईन कायतरी....... देव करन कायतरी".....

"तू कानी भायच लोड घेते. देवालेबी आपली चिंता हायेच ना. होते सगळं बराबर. चाल घरी जाऊ".......


सदाच्या धीराने नामाला थोडे बरे वाटले. दोघेही मग घराकडे निघाले.......


घरी पोचताच कमालीच्या डोक्यावरचे चिंतेचे वादळ थोडे कमी झाले.......

ती म्हणाली "काऊन जी सकाय पासून वावरात गेले, जेवा गिवा च इसरून गेलते का, मी कवा पासून वाट पाऊन रायली".......


"

कायले इतली चिंता करता, होते सबन बराबर. उद्या कान अकाउंट मधी पैसे टाकणार हाये सरकार त्या अति वृष्टी चे.......

"उद्या पायजा बँकेत जाऊन, मंग होते ना दिवाई आपली साजरी"......


"रोज जेवाले भेटते थेच त लय हाये"......

"होईन लेकाचा कापूस"......

"खंडन सारं कर्ज".....

"नाही खडलं त देऊ पुढच्या साली, मुन का लहानसं तोंड करून वावरात जाऊन अभायाकड  पहात बसा लागते का"......

"चाला या हात पाय धून मी जेवाले वाढतो. आज म्या अंबाडीची डायभाजी केली. तुमले आवडते ना. चाला या बर"......

असे म्हणून कमली चुली कडे वळली.


दुसऱ्या दिशी सकाइ सकाई पटवारी गावात आला......

त्यानं लांब लचक लिस्टच आणली ज्याचे ज्याचे पैसे जमा झाले होते त्या सगळ्यायचे नाव त्या लिस्ट मध्ये होते.......

नामा ही तिकडे धावला. पटवाऱ्याने लिस्ट वाचून दाखवली.......

नामचेही नाव त्यात होते. आपले नाव ऐकून नामाच्या चेहऱ्यावर हास्याची लकीर पसरली....

त्याची चिंता आता थोडी कमी झाली होती....

नाही काहीत दिवाळी त साजरी करता येणार होती......

कमालीची साडी, पोरीचा फ्रॉक, पोराचं शर्ट पॅन्ट मिठाई, फटाके त्यात होणार होते.......


त्याने मनातल्या मनात देवाचे आणि सरकारचे आभार मानले......

घरात आता आनंदाचे वातावरण पसरले होते.


संजय रोंघे,

नागपूर .

मोबाईल - 8380074730




Thursday, October 20, 2022

महागाई

पन्नास वर्षा पूर्वी
स्वस्त होते का सारे ।
म्हणतात महागाई पेटली
जगणे नाही खरे ।

विचार थोडा केला
तेव्हा पगार होता किती ।
खर्चाला नव्हत्या वाटा
हलाखीचीच होती स्थिती ।

मोबाईल टीव्ही गाडी
काहीच तर नव्हते तेव्हा ।
हिंडणे फिरणे चालायचे
काम असेल जेव्हा ।

कमावता असे एकटा
मात्र संसार असे मोठा ।
आता कमावते दोघेही
तरी पैशाचाच तोटा ।

शौक पाणी वाढले
नाही मरणाची भीती ।
डॉक्टरही कसा लुटतो
शिल्लक करतो रीती ।

येऊन जाऊन सारखच
नव्हतं तेव्हाही स्वस्त ।
कमी पैशात ही भागते
फक्त विचार हवेत मस्त ।
Sanjay R.


साथ

प्रेमाला ही हवी
कुणाची साथ ।
वाटतं मलाही
हवा एक हात ।

उगवतो  सूर्य
नि होते प्रभात ।
ढग येतो आडवा
मग होतो घात ।

चूक कुठे ढगांची
होते ना बरसात ।
फुलते धरती आणि
जीव येतो जीवात ।

प्रेमाला ही हवी
कुणाची साथ ।
वाटतं मलाही
हवा एक हात ।
Sanjay R.


आठवण

आठवणीनेच मला
होतो किती आनंद ।
वाटतं आता जडला
मला तुझाच छंद ।

तुझ्या आठवणीत
शोधतो मी गंध ।
येशील का जवळ
होशील का सुगंध ।

तुझ्या नि माझ्यात
जुळला एक बंध ।
जवळ आलो की
का होतो मी बेधुंद ।
Sanjay R.