Sunday, October 31, 2021

दूर किती किनारा

नाही कळला इशारा
दूर झाला किनारा ।
गेले निघून वादळ
उरला सारा पसारा ।

घोंगावत किती तो
आला दुष्ट वारा ।
दाटला अंधार मनात
झाला जीव घाबरा ।


शोधू कुठे मी आता
हवा मजला आसरा ।
जीव घेऊन मुठीत
उभा अजून तारा ।
Sanjay R.


" दाटले डोळ्यात अश्रू "

दाटले डोळ्यात अश्रू
परी थेंब एक गळेना ।
ओठात थांबले शब्द
जिव्हा ही का वळेना ।

क्षण दुःखाचे भोगतो
नशिबाचे का कळेना ।
भावना ही या सरल्या
पीडा पाठची टळेना ।

शोधतो सुख दुःखात
का मज तेही मिळेना ।
दिले दुःखच मी पेटवून
तरीही का ते जळेना ।
Sanjay R.



Friday, October 29, 2021

" टोचला काटा माझ्या पायात "

टोचला काटा माझ्या पायात
काढू कसा मी तर वाटेत ।

चालता येईना मज आता
हात घ्या राया थोडा हातात ।

सलतो कसा हो तो छातीत
केलंय घर त्यानं पायात ।

उठु ना देई तो बसू ना देई
लक्षच माझे हो त्याच्यात ।

कुणीतरी काढा हळूच जरा
आसवं आलेत ना डोळ्यात ।

उशीर होतोय हो जायाला
अडकले मी या काट्यात ।
Sanjay R.


Thursday, October 28, 2021

" शब्दांची किमया सारी "

शब्दांना हवी वाचा
नकोच ते मुके ।
होते विरळ सारे
नात्यातले धुके ।

शब्द करी अनर्थ
कधी कोणी चुके ।
शब्दांना हवी गोडी
नाते तिथेच टिके ।

शब्दांची किमया सारी
मग पाषाण ही झुके ।
जोडतो बंध मनाचा
दुःखही वाटे फिके ।
Sanjay R.


Wednesday, October 27, 2021

" नाकावरती रुमाल "

तंत्रज्ञानाची कमाल
होईल सगळीच धमाल ।
हवेच्या प्रदूषणाला
नाकवरती रुमाल ।
अंधार घालवाया
पेटवायची मशाल ।
सोसवत नाही थंडी
ओढायची शाल ।
पावसाचा बचाव
टाकायची तिरपाल ।
असेल पैसा तर
बांधायचा महाल ।
लाजताना होतात ना
गुलाबी गुलाबी गाल ।
रंगात दिसतो उठून
रंग एकच लाल ।
माणूसच माणसाचे
करतो किती हाल ।
त्यासाठी हवी आता
तलवार आणि ढाल ।
घोड्याच्या टाचेला
लावतात ना नाल ।
सुधारेल का जग
की तिरपिच राहील चाल ।
जगा आणि जगू द्या
करू नका बेहाल ।
Sanjay R.