Monday, May 31, 2021

" लग्नातली तर मजाच गेली "

लॉक डाऊन,  लॉक डाऊन. कुठे जाणे नाही, कुठे येणे नाही. घरात बसा, टी व्ही पहा. टाइम पास करा. याशिवाय काहीच काम उरले नाही. मागच्या आठवड्यात मी गावाला जाऊन आलो. सहज फेर फटका मारावा म्हणून शेतावर जाऊन आलो. तर तिकडे आमच्या गावाचा रुप्या भेटला. तोच माझ्या जवळ आला नि बसला ओट्यावर. मी विचारलं काय चाललंय रुपराव. काही नाही जी. दिवस भर आपलं काम करावं रातच्याले घरी जाऊन जेवन खावन करून झोपावं बस हेच सुरू हाये आता. बहिन गावात वीसेक लग्न झाले भाऊ पर एकबी लग्नाले जाले न्हाई भेटलं . दोन वर्षापासून हेच होऊन रायलं. कवा जाईन ह्या  कोरोना, कोणास ठाव. सारी मजाच गेली जी. मलाही आश्चर्यच वाटले , बापरे वीसेक लग्न झाले का गावात. बरेच लग्न झाले. मलाही हा आकडा नव्हता माहीत. तसा रुप्या बोलला,  हो ना जी. मग त्याने एक एकाचे नाव घेऊन मोजणे चालू केले तर खरच मोजून वीस लग्न भरले. पहा जी एवढे लग्न होऊन एकबी लग्नाची हवा नाही  लागली पहा बर. त्याचे म्हणणे बरोबर होते. इतके लग्न होऊन ही दोन चारच लग्नाची माहिती आमंत्रण मला मिळाले होते. बाकी सारे जुळले कुठे, झाले केव्हा काही पत्ताच लागला नव्हता. लोक तरी काय करणार . वीस पंचवीस लोकांत लग्न आटोपणे काही साधी गोस्ट नव्हती. लग्नात हजर राहायला आई वडील, काका, मामा,  भाऊ बहीण, त्यांचा परिवार जरी मोजला तरी पन्नास पार होत होता. आणि परवानगी फक्त दहा ची मग काय करणार . कसे तरी नवरदेव नवरी तयार करायचे. जाऊन एक तासात स्वाहा स्वाहा करून परत फिरायचे. करण सकाळी सात ते अकरा याच वेळेत सगळे आटोपून परत आपल्या घरी पोहचायला हवे ही अट होतीच. त्यासाठी लग्नाचा मुहूर्त मुद्दाम सात साडे सात ठेवायचा. लग्न लागत नाही तर जेवण किंवा फक्त नास्ता करून वर्हाडी रवाना करायचे. जेवणही किती तर वीस पंचवीस लोकांचे. ते तर घरचेच लोक तेवढे जुळायचे. करणार तरी काय. तसा रुप्या बोलला आजी त्या दिलप्याच लग्न झालं ना त बहिन, वऱ्हाडयायले निस्ता मुरमुर्याचा चिवडच दिला जी. जेवनबी त्यायच्या नशिबी नाही आलं. याले बी का लगन म्हणावं .  सारे वर्हाडी उपाशी तापाशी गेले न तसेच वापस आले. एकदम रातच्याले पूजा पाती करूनच जेवले मंग. हे कोनच लग्न म्हणावं. त्याची गोष्ट ऐकून मलाही थोडे वाईटच वाटले. मग मी रुपराव ची फिरकी घ्यावी म्हणून त्याला म्हणालो. रुपराव दोन वर्षांपासून तुमची वांग्याच्या भाजी शी त गाठ भेटच नसन. तसा रुपराव म्हणाला , आजी खरच हाये, बहिन दोन वर्ष पासून पंगतीत बसून वांग्याची भाजी, कढी, आन भजे तोंडालेच लागले नाही. आता निस्ती आठोन येते जी. देवस्थानचे भांडेबी वाट पाहून रायले. मोठं मोठे गंज पराती कोणी नेतच न्हाई. घरच्या भांड्यातच सारं लग्न होऊन जाते. गोष्ट खरीच होती. लोकांना बोलवा गर्दी करा नि पोलीस आले तर दंड भरा. म्हणून कोणी कोणाला लग्न कर्यक्रमात बोलवत पण नव्हते. पण एक बर झालं जी गरीबायचे लग्न मस्त कमी खर्चात आटोपले. बिचारे कर्जबाजरी न्हाई झाले. ते लय खुश हायेत.
हे मात्र खरं होतं. कर्ज काढून, शेत विकून ज्यांना लग्न करावे लागत होते. तास प्रसंग मात्र या दोन वर्षात कुणावर आला नव्हता. आनंदी आनंद होता.


" जीव टाकला ओवाळून "

जीवाची आहे कोणास चिंता
टाकला ओवाळून तुझ्या वर ।
सोबत तुझी असू दे सदाची
बांधायचे मज तुझे माझे घर ।
दिवस असो वा रात्र काळोखी
स्वप्नातही असतो तुझाच वावर ।
आठवणींच्या डोहात फिरतो
तुझ्याविना जातो कुठे हा प्रहर ।
थांबतील हे श्वास जरी माझे
पडेल कसा मज सांग तुझा विसर ।
Sanjay R.

Sunday, May 30, 2021

" कुठे काय चुकलं होतं "

कुठे काय चुकलं होतं
बरोबर तर तुझंच होत ।

झालाना विनाश सारा
होता  कुठे कुणाचा पहारा ।

ठरवलेले तर होतच नाही
अपयशाने होते लाही लाही ।

सांगा कोणी कसे वागायचे  ।
भोग नशिबाचे तर भोगायचे ।
Sanjay R.


Saturday, May 29, 2021

" काय होतं हवं "

काय होतं हवं, काय होतं नको 
सांगतो तुला, नाही कळल मला ।
करतो विचार,  बदलतात आचार
सांगतो तुला, नाही कळल मला ।
विचारांनी थकलो, मी आता हरलो
सांगतो तुला, नाही कळल मला ।
श्वास झाले मंद, पडेल हृदय बंद
सांगतो तुला, नाही कळल मला ।
दूर जळते चिता, म्हणे कशास भिता
सांगतो तुला, नाही कळल मला ।
आले यमाचे दूत, सांगे आहे मी भूत
सांगतो तुला, नाही कळल मला ।
हवी मज मुक्ती, मनात तुझी भक्ती
सांगतो तुला, नाही कळल मला ।
येईल मी परत, आली वेळ सरत 
सांगतो तुला, नाही कळल मला ।
नको आता ध्यास,  मृत्यूचा भास
सांगतो तुला, नाही कळल मला ।
जीवन हे अमर, आजण मी भ्रमर
सांगतो तुला, नाही कळल मला ।
Sanjay R.


Friday, May 28, 2021

" आता काहीच नाही सुचत "

" व्यथा एका रुग्णाची "

बेडवरच आहे मी पडून
नाही काहीच आता सुचत ।

सारखे मनात येतात विचार
वाटतं आता नाही मी वाचत ।

आयुष्यभर कष्ट करून हो
थोडीशी केली होती बचत ।

सरली सारी या दवाखान्यात 
मनही चालले आता खचत ।

उशाखाली जरा बघा माझ्या
बिलं कशी चालली साचत ।

जीवनाचाच हो खेळ  झाला 
भूत कोरोनाचे आहे नाचत ।
Sanjay R.