Saturday, November 30, 2019

" काळजावर घाव "

परत एक डाव
वादळात नाव
जगण्याची हाव
अंतरात धाव
काळजावर घाव
कावळ्यांची काव
स्तब्ध झाली नाव
Sanjay R.

" गावाकडच्या गोष्टी "

आज गावाला जायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो. मात्र लहान असतांना गावाला जायचं म्हटलं की खूप आनंद व्हायचा. जायचा दिवस येईपर्यंत मग नुसती स्वप्न रंगायची . कसं जायचं, केव्हा जायचं, कुठे कुठे जायचं, गेल्यावर काय काय करायचं, कुना कुणाला भेटायचं. शेतात काय असेल, आंब्याच्या झाडाला आंबे लागले असतील मग ते कसे तोडायचे. राखणदार असेल मग त्याला चुकवून कसे झाडावर चढायचे. सगळ्या गोष्टीवर विचार व्हायचे.
आणि मग गावाला गेल्यावर मस्त मजा करायची.
आंबे , बेल फळ, शिंदीच्या झाडाचा बुंधा चिंचा खाताना खूप मस्त मजा यायची, गावातल्या मुलांसोबत गाई बैलांना घेऊन शेतात चरायला न्यायचे, नदीत सकाळी पोहायला जायचे, सायंकाळी नदी काठी फिरायला जायचे, कधी जाळे लावून मासे पकडायचे, रात्री अंगणात खाटेवर पडून चांदणे मोजायचे तर सप्तर्षी म्हणजे चार चांदण्या म्हणजे बुढीचे खाटले आणि तीन चांदण्या म्हणजे तीन चोर , ते तीन चोर बुढी झोपायची वाट बघत आहेत,आणि चोरीच्या भीती पाई बुढी कशी रात्रभर जागी राहते या कथेवर चर्चा व्हायची. झोप येईस्तो कथा कथन चालायचे, त्यात राजा राणी, राक्षस अशा अनेक कथा असायच्या.
आज मात्र गावातील ते जीवन पूर्ण पणे बदललंय.
नद्यांच्या ठिकाणी नुसती एक नाली वाहतेय.
आमराईतले आंब्याचे बन पूर्णतः गायब झाले आहे. शिंदीचे बन पण संपले आहे, एखादं दुसरे झाड फक्त साक्ष द्यायला उभे आहे.
गावातले जीवनच पूर्णतः बदलून गेले.
मातीच्या घरा ऐवजी विटा सिमेंट ची घरं झालीत.
सोबत गावातली माणसं पण बदलली.
त्यावेळची माया, प्रेम, जिव्हाळा आता उरलाच नाही.
आता ते गावच राहिले नाही. त्याचे पण शहरीकरण झाले आहे. लोकं पण कोरड्या मनाची झालेली दिसतात.
काळानुसार बदल तर व्हायलाच हवा. पण जो एक कोरडेपणा जाणवतो, तो बघून मन दुःखी होते.
गाव गावच राहिला नाही.

संजय रोंघे
नागपूर

Friday, November 29, 2019

" शिक्षण वाटे एक भार "

वाटे शिक्षण साऱ्यास
जीवनाचा आधार ।
होईल कमी थोडा
या गरिबीचा भार ।

पण हा तर आहे
फक्त एक विचार ।
होते बंद कसे
उपजीविकेचे दार ।

उच्च शिक्षित किती
झालेत कसे बेरोजगार ।
नोकरी विना भटकती
बघा सारेच हुशार।

सांगा हुशार किती
आपले हे सरकार ।
अर्ध्या आयुष्याचा
केला कसा बाजार ।

दिला शिक्षणाने
युवकांना कसा आजार ।
घेतला हिसकावून
जगण्याचा आधार ।

काम धाम नाही कुणा
वाटे घरात तो भार ।
हाच तर आहे बघा
शिक्षणाचा सार ।
Sanjay R.

Thursday, November 28, 2019

" जाऊ नकोस दूर "

जाऊ नकोस दूर
मन माझे आतुर
गुंजतो कानात सूर
झरे आसवांचा पूर
का झालास फितूर
हृदय झाले चुरचुर
नको होऊस क्रूर
अंतरात रे तूच
जाऊ नकोस दूर
Sanjay R.

Wednesday, November 27, 2019

" पडकी विहीर "

कान अधीर
डोळे भिरभिर ।
श्वास थांबले
सुटला धीर ।
शब्द सुचेना
मन अस्थिर ।
सांज ढळली
झाला उशीर ।
रात किडेही
करती किरकिर ।
काळोखात ती
पडकी विहीर ।
कुणी हसले
सुटले तिर ।
स्वप्न सरले
मिटली लकीर ।
Sanjay R.