Thursday, October 7, 2021

" असेच तू हसत राहा "

असेच तू हसत राहा
दिसेल गालावर खळी ।
हास्यातून तुझ्या मग
उमलेल एक कळी ।

लागले वेड मनाला
आठवण मज छळे ।
बघ नेत्रात माझ्या
आसवांचेच ते तळे ।

आस मजला तुझी
मन माझे जाळी ।
बघ जरा तू मज
नाव तुझेच भाळी ।
Sanjay R.

Wednesday, October 6, 2021

" अंतरीचे सुख "

जीवनात या
दोनच वाटा ।
सुख दुःखाला
आहे कुठे तोटा ।

कोण चूकतो
छोटा वा मोठा ।
भुके पुढे बघा
पैसाही खोटा ।

नशिबाचा खेळ
डोईवर गोटा ।
लोळतो कुणी
उशाखाली नोटा ।

असाल दुःखी
सुखाला भेटा ।
सुखात असता
थोडे कष्ट रेटा ।

वैकुंठाच्या दारात
नाही कोणी मोठा ।
असू दे देवा मज
असाच रे छोटा ।
Sanjay R.


" सुख नाही तरी "

किती ही धावपळ
कशासाठी धडपड ।
पैसा पैसा करत
चाले सारी गडबड ।

चुकते कधी वाट
सोसणाऱ्याची तळमळ ।
सुख नाही तरी
डोळ्यात अश्रू भळभळ ।

पाणी कुठे हो थांबते
वाहते ते झळझळ ।
भोगतो सारे भोग
कुणाला अशी हळहळ ।
Sanjay R.


Tuesday, October 5, 2021

" सांगू कुणास दुःख माझे "

सांगू कुणास दुःख माझे
आठवतात मज बोल तुझे ।
बघून माझा शर्ट फटका
बघून माझेच मन लाजे ।

भूक पोटाची देई आवाज
माय लेकरास पाणी पाजे ।
गरीबाचीच ही व्यथा सारी
दिसे डोळ्यात दुःख ताजे ।

अश्रुंचे माझ्या काय मोल
गालावरती लाचारी सजे ।
कुबेराने दिले मज लोटून
येण्या जवळ कोण धजे ।
Sanjay R.


" सुख दुःख "

दुःखा मागून येते सुख
लावू नको तू रुखरुख ।
वाट जरी ही वळणाची
चालत राहा नाही चूक ।
कष्ट सारे हे जगण्यासाठी
पोट दिले तर आहे भूक ।

खडतर जरी ही वाट तरी
धोंडे सारेच आहेत मूक ।
नको पाहुस दुःख तयाचे
काय खरे नि काय चूक ।

मधेच कोणी देईल साद
अंधार मागे दिसेल अंधुक ।
पुढे पुढे तू चालत राहा
निर्णय तुझा असेल अचूक । 
Sanjay R.