Wednesday, September 16, 2020

" रंग तुझा वेगळा "

नवरंगांनी रंगलेली ही दुनिया
त्यात रंगच तुझा तो वेगळा ।
चित्रकार तो दूर कुठे अदृश्य
विचार मनात त्याच्या आगळा ।

हिरवी झाडं शुभ्र आकाश

मधेच कुठे होते पानगळ ।
वाहतो वारा कुठून कुठे हा
नाद घुमतो होते सळसळ ।

गर्जती मेघही कधी आकाशी
वीजही जाते लखलख करुनी ।
पावसाची जेव्हा होते बरसात
वाहते पाणी मग लोट धरुनी ।

नदी नाले भरतात तुडुंब
काठ न उरतो जातो विळुनी ।
धरा न उरते मागे ती सरते
जिकडे तिकडे पानी पानी ।
Sanjay R.


Tuesday, September 15, 2020

" सकाळ "

रम्य असते सकाळ
गार गार वारा ।
उजळून निघते आकाश
उगवतो सूर्य तारा ।
चिव चिव पाखरांची
आगळी निसर्गाची तऱ्हा ।
नाद घंटाचा चाले
भाव भक्तीचा इशारा ।
Sanjay R.

Thursday, September 10, 2020

" सरणार नाही आकांत "

चक्र हे या जीवनाचे
सरणार नाही आकांत ।

जाणुनी करी जो परमार्थ
होई तोचि मोठा संत  ।

मिरवणारेही बहुत इथे
म्हणवितात मी तर पंत ।

नियम सृष्टीचा लागू होतो
फळ मिळे सर्वां तंतो तंत ।

ज्याचे त्याचे कर्म जसे
होईल त्याचा तसाच अंत ।
Sanjay R.

Wednesday, September 9, 2020

" एकटाच जाणार "

एकटाच येतो तो
एकटाच जाणार ।
परिक्रमा एकट्याचीच
एकटाच पूर्ण करणार ।

प्रवासाचे सोबती सारे
जन्माला कोण पुरणार ।
चार पावलंच अंताला
मागे पुढे चालणार ।

अंतच आहे सत्य
सारे इथेच सरणार ।
मोह माया प्रेम सारे
आहे इथेच उरणार ।
Sanjay R.


Tuesday, September 8, 2020

" मृगजळ "

मायावी ही दुनिया
मृगजळ सारे ।
भरलेले सागर 
कोरडे नदी किनारे ।

बरसत्या पावसात
शुष्क वाहते वारे ।
सूर्याच्या प्रकाशात
चमचमतात तारे ।

नसताना वादळ
फुलतात पिसारे ।
शांत नुसते भास
अशांत ते बिचारे ।

आनंदी मुखवट्यात
दुःख किती सारे ।
पापणीच्या आड
आहे आसवांचे झरे ।
Sanjay R.