Saturday, March 30, 2024

हवी श्वासात

स्वप्नांना लावूनी पंख
चल जाऊ गगनात ।
सूर्य गेला आडोश्याला
थोडे हसू चांदण्यात ।

असू दे रात्र ही काळी
काजवेही चमचमतात ।
दरवळ रात राणीचा नी
पारिजात फुलतो मनात ।

कशी बेधुंद ही हवा
जाते सांगून कानात ।
तुझ्या विना नको काही
हवी तू मज श्वासात ।
Sanjay R.










Thursday, March 14, 2024

विसर सारे

जा विसर आता सारे
नकोच तू आसवे गाळू ।
रामाचे हे वचन नाही
तेही नकोस तू पाळू ।

ह्रदयही हे माझेच 
सांग मी कशास जाळू ।
विचारांनी बधीर झाला
उघडा बोडखा हा टाळू ।

मोगरा ही सुकून गेला
कसा तो केसात माळू ।
अंतरात न उरले आता
सांग तुलाच का छळू ।
Sanjay R.

Friday, March 8, 2024

स्त्री जन्म

स्त्री जन्म हा मिळावा पुन्हा
की पूर्व जन्माचा हा गुन्हा ।
काळ लोटला वेळ लोटली
परंपरेचा तो पडदा जुना ।

नव्हती तेव्हाही अबला ती
आहेत अजुनी त्यांच्या खुणा ।
कितीक मर्दानी होऊन गेल्या
इतिहास सांगतो पुन्हा पुन्हा ।

जननी भगिनी सहचारी ती
आहे विश्वाचा मुख्य कणा ।
नमन आम्ही तिलाच करतो
तिच्या विना तर आभास सूना ।
Sanjay R.


Friday, January 19, 2024

खरा आनंद

पाहता तुला मी
नकळे मला काही ।
शोधतो तुला मी
उरले कुठे काही ।

हरपले भान आता
धुंद मनात काही ।
कळेना काय ते
मनात काही काही ।

वाटते स्वप्न ते
डोळ्यात झोप नाही ।
अंधार वाटतो बरा
अंतरात बरेच काही ।
Sanjay R.


Saturday, November 11, 2023

नोव्हेंबर 2023 कविता प्रकाशित

माझे व्यासपीठ या मुंबई येथून प्रकाशित होणाऱ्या नोव्हेंबर 2023 च्या मासिक अंकात माझी   रोजच इथे दिवाळी कविता प्रकाशित झाली.
संपादकांचे मनापासून आभार.